सिल्लोड(औरंगाबाद) - अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीच्या वर्गातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू (Three children drown in farmlake) झाला. तर इतर दोघे यात बचावले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.
दोघे बचावले - सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गाव परिसरातील अनाड रस्त्यावर एका शेततळ्यात आज दुपारी 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. उमेरखान नासिरखांन पठान (वय १६ वर्ष रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज (वय १६ वर्ष रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा), अक्रमखान आयुबखान पठान (वय १६ वर्ष रा.बगीचा मज्जीत समोर अजिंठा) असे मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
तिघांना वाचवण्याचा प्रयत्न - रेहान खान इरफान खान, फैजानखान शफीखान हे दोघे यात बचावले आहेत. हे दोघेही १० वीचे विद्यार्थी असून, त्यांनीही बुधवारी परीक्षा दिली होती. या दोघांनाही पोहता येत नव्हते. मात्र, त्यांनी तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. रेहान खान हासुद्धा पाण्यात बुडाला होता. पण, कसेबसे त्याने आपले जीव वाचवले तर फैजानखान याने ठिबकची नळीला पकडून वर आला व लोकांना मदत मागितली.
पोलीस अधिकारी घटनास्थळी - या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी दिली.