औरंगाबाद : पैठण गेट परिसरात भरवस्तीत जोएब कुरेशी हा व्यक्ती कॉलसेंटर चालवत होता. त्यामध्ये तब्बल दीडशे तरुण-तरुणी काम करीत होते. डेहराडून पोलिसांच्या माध्यमातून तब्बल 12 तास झाडाझडती घेतल्यानंतर हे कॉल सेंटर आता सील करण्यात आले आहे. डेहराडून पोलिसांच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि नंतर औरंगाबादपर्यंत तपास करीत पथक येथपर्यंत पोहोचले. उपअधीक्षकासह सहा जणांचे पथक बुधवारी शहरात दाखल झाले. पोलीस उपायुक्तांकडे त्यांनी मदतीची विनंती केल्यानंतर सायबर सेल, गुन्हे शाखा पथक आणि क्रांती चौक पोलीस पैठण गेट परिसरात दाखल झाले. यश इंटरप्राईजेसच्या नावाखाली हे कॉल सेंटर तिथे सुरू होते.
कॉल सेंटर अधिकृत : पैठण गेट येथे सुरू असलेले यश एंटरप्राइजेस हे व्होडाफोन, आयडीबीआय आणि भारत पे यांचे अधिकृत कॉल सेंटर असल्याचे कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे. मात्र, डेहराडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे असलेल्या तक्रारदारांना 33 सीम कार्डद्वारे फोन करण्यात आले होते. त्यांचे लोकेशन पैठण गेट येथे याच कॉल सेंटरचे आढळून आले. त्यापैकी 23 सीमकार्ड या ठिकाणी आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी 134 साधे मोबाईल, दहा अँड्रॉइड मोबाईल, एक लॅपटॉप, तेराशे ते चौदाशे सीम कार्ड ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असून, अधिकृत कॉल सेंटर असलेल्या कंपन्यांना पत्रव्यवहार करून अधिक माहिती काढली जात आहे, अशी माहिती सायबर सेल पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
डेहराडूनमध्ये दाखल आहेत 250 तक्रारी : पैठण गेट परिसरात देहराडून पोलिसांच्या मदतीने छापा टाकल्यावर, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीमकार्ड मोबाईल, दोन तलवारी आढळून आल्या आलेत. दुपारी बारा वाजता सुरू झालेला तपासणी सत्र रात्री एकच्या सुमारापर्यंत चालू होते. यामध्ये कॉल सेंटरमधून इन्स्टंट लोन ॲपद्वारे कर्ज घेतलेल्यांना, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे पुरावे पोलिसांना आढळून आले. डेहराडून मध्ये ब्लॅकमेलिंग करण्याच्या जवळपास अडीचशे तक्रारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्ज वसुलीचे कॉल सेंटर सुरू : या कारवाईत मूळ मालक अद्याप सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जोएब नामक तरुण आधी कॉल सेंटरमध्ये काम करायचा. नंतर त्याने स्वतःच ऑपरेटर कंपन्यांसाठीचे कर्ज वसुलीचे कॉल सेंटर सुरू केले. त्याच्या नावाखाली त्याचे ब्लॅकमेलिंगचे कॉल सेंटर असून, दीडशे तरुण तरुणी त्याच्याकडे काम करीत होते. पंधरा हजार रुपयांपर्यंत त्यांना तो पगारही देत होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, मोठी माहिती उघड होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
कॉल सेंटरमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा समावेश : कारवाई करण्यात आलेल्या कॉल सेंटरमध्ये दीडशे युवक-युवती काम करीत होते. पैठण गेट हा परिसर शहराच्या मध्यवस्तीत असून, आसपास अनेक महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसदेखील आहेत. बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी राहण्याची सोयदेखील येथे उपलब्ध होती. अशा ठिकाणी हे कॉल सेंटर सुरू करून मुलांना फावल्या वेळेत पैसे कमवण्यासाठी सोपे माध्यम उपलब्ध झाले होते. त्यामुळे हे ठिकाण कॉल सेंटरसाठी उपयुक्त असल्याने तिचे हे काम करणे सोपे होत होते.
दोन वर्षांपासून सुरू होते कॉल सेंटर : शहराच्या मध्यवस्तीत गेल्या दोन वर्षांपासून हे कॉल सेंटर सर्रास सुरू होते. कर्ज घेतलेल्या लोकांना वसुलीसाठी फोन करणे, त्यांना दररोज व्याज लावणे, वसुलीसाठी धमक्या देणे. असे काम या ठिकाणी सुरू होते. आठ ते दहा दिवसांमध्ये वसुली सुरू केली जायची. पैसे न देणाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करणे, धमकावणे, सोशल मीडियावर अकाउंटचा ताबा मिळवून बदनामी करणे, त्यांच्या मित्रांचा क्रमांक मिळवून कर्ज घेतलेले यांच्या नावे अश्लील फोटो मेसेज पाठवण्यापर्यंत कंपन्यांच्या लोकांची मजलसुद्धा गेली होती. डेहराडून येथील एका व्यक्तीने अशाच ॲपवरून कर्ज घेतले होते. तो वेळेवर पैसे देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला काही दिवसांतच त्रास द्यायला सुरुवात केला होती. तेथे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर पुढील तपासाची चक्र फिरली आणि पोलीस औरंगाबाद येथे पोहोचले.