औरंगाबाद - भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होतो, असे मला वाटत नाही. राज्यात सर्वाधिक ओबीसी मंत्री युतीच्या काळात होते, असे मत रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच, पंकजा मुंडे या कायम भाजपमध्येच राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
"आज भाजप सत्तेत नाही म्हणुन आम्ही त्यांना सोडून जाणार नाही. रासपचा एकच आमदार आहे. आमच्या पाठिंब्याने कोणाची सत्ता येणार किंवा जाणार नाही. मात्र, आम्ही दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे रासप भाजप सोबतच राहील" असेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - मंत्रीपदाबाबत माझी आता काहीच इच्छा नाही, पण जे मिळेल ते मी स्वीकारेन- महादेव जानकर
जानकर यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या भाजपमध्ये सारे काही अलबेल नसल्याच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला आहे. जानकर म्हणाले,"इतर कोणत्या पक्षाबद्दल आपण बोलू नये. भाजपने काय करावे काय नाही याबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. कोणत्या पक्षात काय सुरू आहे याबाबत भाष्य करायला आम्ही काही प्रकाश शेंडगे नाही"