गंगापूर (औरंगाबाद) गंगापूर तालुक्यातील कानोबावाडी येथील माऊली शिवारात वास्तव्यास असलेल्या शेतकरी निसार माजिद शेख यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला, व पेटीत ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
22 मार्चला आहे निसार यांच्या मुलीचे लग्न
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निसार माजिद शेख (रा.माऊली शिवार, कान्होबावाडी, ता.गंगापूर) या शेतकऱ्याच्या मुलीचे येत्या २२ मार्चला लग्न आहे. लग्नासाठी लागणारे सोन्याचे दागिने त्यांनी घरात आणून ठेवले होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या छताचा पत्रा उचकटून घरात प्रवेश केला, व घरात ठेवलेले रोख 90 हजार रु. साडेचार ग्रॅम सोन्याचे कानातले, पायातील पैंजण असा एकूण 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. निसार माजिद शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.