औरंगाबाद - एका एस.टी पासधारक मुलीच्या आईने आणि भावाने वाहक महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे घडली. बसमध्ये गर्दी असल्याने वाहकाने त्यांना मागे बसा असे सांगितले. त्या रागातून त्यांनी महिला वाहकाला मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद आहे. बसमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये घडलेला प्रकार कैद केला आहे. या प्रकरणी वाहकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
गुरुवारी सायंकाळी (एम.एच २० बी.एल.१८९३) या क्रमांकाची बस वैजापूरहून सिरसगावला जात होती. त्यावेळी वाहक आशा सोनवणे या कर्तव्यावर होत्या. प्रवासी अंजली अशोक शेजवळ हिने वाहकाला मासिक पास दाखवली. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे सोनवणे यांनी अंजलीला पाठीमागे व्हा, असे म्हटले. त्याचा राग आल्याने अंजलीने वाहकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळाने बस मुलीच्या गावात (जांबरगाव) पोहोचली.
बसमधून प्रवासी खाली उतरत असताना अंजलीने वाहकाला पुन्हा शिवीगाळ सुरू केली. त्यावर महिला वाहक बसमधून खाली उतरल्या आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचदरम्यान अंजलीने महिला वाहकाला मारण्यास सुरुवात केली. प्रसंगी अंजलीचा भाऊ व आईनेही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीदेखील सोनवणे यांना चापट व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.