छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. एकेकाळी सुटलेले शिक्षण पूर्ण करून आयुष्याला नवीन सुरुवात देता येते. हे शहरात राहणाऱ्या दोन बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे. कमी वयात लग्न झाल्याने शिक्षण सुटले. पुढे जबाबदारी म्हणून शिक्षणासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे दोघी बहिणींनी मुले मोठी झाल्यावर शिक्षण घेण्याचा निर्णय घेत दहावीची परीक्षा दिली आणि पासही झाल्या. उषा मोरे व रत्नमाला मोरे ही या दोघी सख्ख्या बहिणींचे नावे आहेत.
दोघी बहिणींनी केली परीक्षा उत्तीर्ण - उषा मोरे या दहावीला 2005 साली नापास झाल्याने घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. संसार आणि कुटुंबाची जबाबदारी त्यामुळे पुन्हा शिक्षण घेणे शक्य झाले नाही. तर रत्नमाला मोरे यांचे नववीला असतानाच लग्न झाल्याने पुढचे शिक्षण त्यांना घेता आले नाही. मात्र शिक्षण पूर्ण झाले नाही याबाबत मनात खंत होती. मुले मोठी झाली, मात्र राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रौढ महाविद्यालयाच्या माध्यमातून दहावीला प्रवेश घेत मार्च 2023 ची परिक्षा त्या दोघींनी दिली आणि उत्तीर्णही झाल्या.
आयुष्यात शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. मात्र आजही देशात मुलींच्या शिक्षणाचा दर घसरलेलाच पाहायला मिळतोय. ग्रामीण भागात मुलगी शिक्षणात कमी दिसली की लगेच तिचे लग्न लावून संसार मांडून दिला जातो. मात्र त्या मुलीला काय वाटते याबाबत कसलाही विचार आजही होताना दिसत नाही. मात्र शहरात राहणाऱ्या रत्नमाला मोरे आणि उषा मोरे या दोघी बहिणी आयुष्याच्या वळणावर सुटलेले एक स्वप्न वयाच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण केले.
दहावीच्या परीक्षेत उषा यांनी 63 टक्के तर रत्नमाला यांनी 64 टक्के गुण मिळवले आहेत. आता उषा व रत्नमाला या दोघींनाही पुढे उच्च शिक्षण घेऊन, नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे अनेक महिलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण होईल हे मात्र नक्की.
हेही वाचा..