गंगापूर : औरंगाबाद- नगर महामार्गावर टिप्पर आणि दुचाकीचा अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मीराबाई नंदू बोराडे असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, नितीन नंदू बोराडे गंभीर जखमी झाला आहे.
धडक देऊन टिप्पर झाला फरार -
वडगाव रामपुरी येथील नितीन नंदू बोराडे हा आपली आई मिराबाईसह दुचाकीवरून (एम. एच. 20 ई ए-9306) काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद ते नगर रोडने गंगापूरकडे जात होता. यावेळी जिकठाण फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा टिप्परने दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यानंतर घटनास्थळावरून हायवा टिप्पर चालक फरार झाला.
हेही वाचा - गुजरातमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपीला पुण्यातून अटक
सामाजिक कार्यकर्त्याने केली मदत -
या अपघातात दुचाकीवरील मिराबाई बोराडे या रोडवर खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. तर दुचाकी चालक नितीन नंदू बोराडे गंभीर जखमी झाला. यावेळी रुग्णवाहिका लवकर आली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांच्या मदतीने वाळूज पोलिसांनी मिराबाईंना खाजगी वाहनाने उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे तपासल्यानंतर डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, नितीन नंदू बोराडेच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, चर्चा मात्र होणार सरकारवर झालेल्या आरोपांची?