औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील १३ वर्षीय अलपवयीन मुलीला नामांकित बँकेच्या कर्जवसुली एजंटाने 'आय लव्ह यू'ची चिठ्ठी देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरड केल्यामुळे शेजारील लोकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकारानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत
अण्णा सांडू शेपूट (३०, रा. मयूरपार्क) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अण्णा हा एचडीएफसी बँकेचा वसुली एजंट आहे. बँकेच्या थकबाकीदार कर्जदाराकडून हप्ते वसुलीचे तो काम करतो. दरम्यान १३मे रोजी मुकुंदवाडी परिसरात पीडितेच्या घरी कर्जाचे हप्ता नेण्यासाठी अण्णा घरी गेला. यावेळी पीडितेचे आई, बाबा घरी नव्हते. ही संधी साधून त्याने अचानक तिला आय लव यू ची चिठ्ठी लिहून दिली. या प्रकाराने मुलगी घाबरून गेली. तिने शेजाऱ्यांना बोलविले. संधी मिळताच त्याने ती चिठ्ठी फाडून टाकली. शेजाऱ्यासह इतर लोक मदतीला धावले तेव्हा एजंट अण्णा पळून जाण्याच्या तयारीत होता.
आरोपीला अटक
यावेळी नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.