औरंगाबाद - नोकरी लावण्याच्या आमिषाने राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांनी अत्याचार केल्याची तक्रार एका तरुणीने दिल्याने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आरोपी राजकीय व्यक्ती असल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घातल्याचे म्हणत औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. पीडितेच्या दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही मेहबूब शेख याला अटक का करण्यात आली नाही, अशी विचारणा करत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले.
नोकरी लावण्याच्या आमिषाने राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार एका तरुणीने तक्रार दाखल केली होती. मात्र, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिली. आरोपी आणि फिर्यादी या दोघांच्याही फोनची माहिती काढण्यात आली. त्याच्या आधारे फिर्यादी आणि आरोपीचा गेले वर्षभर एकदाही संपर्क झाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.
मेहबूब शेख यांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यामुळे पिडीत महिलेने खंडपीठात धाव घेतली. त्यानुसार पीडितेच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परिपत्रकानुसार अशा प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. तसेच पोलिसांनी आरोपीस अटक न करता पुरावे नसल्याचा अहवाल दाखल केला. त्यामुळे न्यायालयाने यावर बोलताना पोलिसांवर ताशेरे ओढत, आरोपी राजकीय व्यक्ती असल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घातल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली.