औरंगाबाद - प्लास्टिक मुक्त होणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी शासनाद्वारे नेहमी आवाहन देखील केले जाते. मात्र त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो. मात्र नागरिकांना प्रत्साहन देण्यासाठी आदर्श पाटोदा ग्रामपंचायत तर्फे प्लास्टिक खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे गाव प्लास्टिक मुक्त करण्यात मदत होत आहे. पाटोदा गावातील या उपक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
ग्रामपंचायतीने सुरू केले प्लास्टिक खरेदी केंद्र -
पर्यावरण बचावासाठी प्लास्टिक मुक्त गाव ही संकल्पना राबवण्याचा हेतून पाटोदा ग्रामपंचायत मार्फत प्लास्टिक खरेदी केंद्र करण्यात आले. दर रविवारी हे केंद्र नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात येते. पंधरा रुपये किलो दराने नागरिकांकडून विकत घेतले जाते. विशेषतः लहान मुलांना प्लास्टिक मुक्ती संकल्पना रुचावी याकरिता त्यांना प्लास्टिक आणण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांनी आणलेले प्लास्टिक घेऊन बिस्कीट खाण्यासाठी त्यांना पैसे दिले जातात. टाकाऊ वस्तूंचे पैसे मिळत असल्याने मुलांसोबत गावातील महिला आणि पुरुष मंडळी देखील प्लास्टिक साठवणूक करून रविवारी विक्रीसाठी ग्रामपंचायत मध्ये आणतात अशी माहिती ग्रामविकास अधिकारी पुंडलिक पाटील यांनी दिली.
तोटा असूनही करण्यात येते प्लास्टिक खरेदी -
नागरिकांकडून 15 रुपये किलोने प्लास्टिक विकत घेतल्यावर ते प्लास्टिक पुनर्वापर करण्यासाठी खाजगी कंपन्यांना जमा केलेले प्लास्टिक विकण्याबाबत पाटोदा ग्रामपंचायत करारबद्ध होणार आहे. मात्र त्यावेळी घेतलेले प्लास्टिक कमी दराने विक्री करावे लागणार आहे. यामध्ये तोटा जरी असला तरी प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मत उपसरपंच कपिल पेरे यांनी सांगितले. कचरा संकलित करत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येते. ते बाजूला करताना अनेक अडचणी येतात. प्लास्टिक खरेदी करत असल्याने आता कचऱ्यामध्ये प्लास्टिक येत नाही, त्यामुळे काम सोपं होतं असून त्यामुळे नुकसान जरी होणार असल तरी ग्रामपंचायतीला प्लास्टिक संकलन करणे सोपे होत असल्याने हा उपक्रम राबवत असून त्याचा फायदा होत असल्याचं उपसरपंच कपिल पेरे यांनी सांगितले.
नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद -
ग्रामपंचायत तर्फे राबवल्याजणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी नागरिक आपल्याकडे जमलेले प्लास्टिक, कॅरीबॅग, चिप्सचे रिकामे पाकीट आदी घेऊन येतात. कोणी किती प्लास्टिक दिले याबाबत नोंद घेतली जाते. आणि त्यानुसार त्याचे पैसे त्यांना जागेवर दिले जातात. त्यामुळे नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. गाव स्वच्छ तर होतच आहे त्याचबरोबर पैसे देखील मिळत असल्याने चांगलं वाटत असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं.