औरंगाबाद - केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेले व्हेंटिलेटर खराब असल्याचे समोर आल्यानंतर या व्हेंटिलेटरची तपासणी करण्यासाठी दोन डॉक्टर घाटी रुग्णालयात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने ऍड अनिल सिंग यांनी दिली आहे.
सुमोटो याचिकेत या प्रकरणी विचारणा
विविध वर्तमानपत्र आणि बातम्यांमध्ये घाटी रुग्णालयाला देण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेत या प्रकरणी विचारणा केली. इतकंच नाही, तर राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत, व्हेंटिलेटर दुरुस्त करून देणार की बदलून देणार याबाबत विचारलं होत. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी दोन डॉक्टर पाहणी करणार असल्याचे सांगितले. त्यावर सदरील रिपोर्ट (7 जून) रोजी न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन डॉक्टर करणार पाहणी
खराब व्हेंटिलेटरबाबत मुख्य सरकारी वकील यांनी कोर्टासमोर (29 मे 2021) रोजी रिपोर्ट सादर केला. ज्यात 26 मेंबर कमिटी यांनी रिपोर्ट सादर केला, की व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य नाहीत असे स्पष्टीकरण दिलेले होते. त्यावर (3 जून) रोजी दोन डॉक्टर केंद्राने घाटी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटरची तपासणी करणार आहेत. त्यामध्ये एक डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि सफदरगंज रुग्णालय येथून, एक तज्ञ डॉक्टर असणार आहेत. अशी माहिती ऍड अनिल सिंग यांनी खंडपीठाला दिली. कोर्टाने याबाबतचा रिपोर्ट कोर्टासमोर (7 जून 21) ला सादर करायला सांगितले आहे. पुढील सुनावणी (7 जून) रोजी होईल, अशी माहिती न्यायालयीन मित्र ऍड सत्यजित बोरा यांनी दिली.