औरंगाबाद - शहरात ५ जूनपासून बाजारपेठ उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. सकाळी 9 ते 5 यावेळेत बाजार उघडण्यास सशर्त परवानगी दुकानदारांना मिळाली आहे. मात्र, यातील काही नियमांना व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
बाजारपेठ उघडत असताना सम आणि विषम तारखेला दुकाने उघडी ठेवावी. दुकान मालकांनी आपल्या दुकानात ऑक्सिमीटर आणि थर्मल चेकींग मशीन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शहरातील बाजारपेठ इतकी मोठी नाही त्यामुळे हा नियम लावल्यास त्याचा व्यापाऱ्यांना तोटा आहे. त्याच बरोबर नव्याने लागणारी साधन सामुग्री घेण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांकडे पैसे राहिलेले नाहीत, त्यामुळे काही नियमांना व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. आता केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठा मर्यादित वेळेत सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, स्थानिक परिस्थिती बघून जिल्हाधिकारी, महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांनी निर्णय घेण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ५ जूनपासून शहरातील दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सकाळी 9 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडताना काही नियम लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये सॅनिटायझर, मास्कच्या वापरासह थर्मल मशीन आणि ऑक्सिमीटर वापरणे बंधनकारक असणार आहे. सम-विषमचा नियम लावल्यास कोणाचाही फायदा होणार नाही. त्यामुळे हे नियम न लावता दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱयांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्यापारी महासंघाने एक निवेदन दिले आहे. व्यापारी स्वतः काळजी घेतील, असे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले आहे.