औरंगाबाद - कोरोना महामारीचा मंडप व्यावसायिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनाकाळात बंदी असल्याने उत्सव व समारंभाचे आयोजन केले जात नाही. बंदीमुळे मंडप व्यवसायिक आणि संलग्न व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बंदी उठवण्यासाठी आज मंडप व्यवसायिकांकडून एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. तातडीने व्यवसायावरील निर्बंध उठवावा, अशी मागणी मंडप व्यवसायिकांनी सरकारकडे केली आहे.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप व्यवसायिक, फोटोग्राफर, लाइट डेकोरेशन, कॅटरर्स आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. दिवाळीच्या काळात व्यवसायाला तेजी असते. त्यामुळे तातडीने व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी आंदोलक व्यवसायिकांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन -
केंद्र सरकारने काही व्यवसायांना परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्र सरकारने अनेक व्यवसायांवरील बंदी कायम ठेवली आहे. त्यातच मंडप डेकोरेशन, साऊंड व्यवसाय आणि लाइट व्यवसाय यांच्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून हाताला काम नसल्याने आपले कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न व्यवसायिकांसमोर पडला आहे. मंडप व्यवसाय असेल किंवा समारंभासाठी निगडित इतर व्यवसायांना लवकर परवानगी द्यावी, या मागणीसाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
मंडप आधारित उद्योगांवर संकट -
केंद्र सरकारने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली, तशीच परवानगी राज्य सरकारनेही द्यावी. जे काही नियम आहेत, त्यांचे आम्ही पालन करू, असे आश्वासन या आंदोलकांनी दिले. लवकरात लवकर व्यवसाय सुरू करायला हवा, अन्यथा आमच्या व्यवसायाला पूरक जे काही उद्योग आहेत. त्यांच्यासमोरही मोठी अडचण निर्माण होईल, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
बँड आणि घोडे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ -
लग्न समारंभ म्हटले की, वरातीमध्ये बँड आणि घोडा हा असतोच. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून लग्न समारंभात वरात काढली जाणार नाही, हा नियम लावण्यात आला आहे. त्यामुळे बँड आणि घोडे व्यवसायिकांवर खूप मोठ संकट ओढवले आहे.