औरंगाबाद (वैजापूर) - नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या माफियावर कारवाई करताना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अंगावर वाळू तस्करांनी जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 10 मार्च)रोजी पहाटे लाखणी, ता. वैजापूर येथील शिवना नदीपात्रात घडला. कारवाईसाठी पथकासोबतच्या सुरक्षाकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे तहसीलदार गायकवाड तस्करांच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले.
पाच ते सहा जणांविरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा
या हल्ल्या दरम्यान सुरक्षा रक्षकाने जेसीबीचालकावर सुरक्षा रक्षकाने बंदूक रोखल्यामुळे हल्लेखोर जेसीबी यंत्र सोडून अंधारात पसार झाले. जवळपास अर्धा तास वाळू तस्कर आणि महसूल विभागात समोरासमोर संघर्ष झाला. सुरक्षा रक्षकाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तस्कर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. या कारवाईत पथकाने तस्करीच्या मालकीचे विना क्रमांकाचा एक हायवा ट्रक व जेसीबी यंत्र जप्त करून शिऊर पोलिसांच्या ताब्यात दिले. तहसीलदार गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच ते सहा जणांविरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पथकाला पाहताच हायवा चालकाने धूम ठोकली
वैजापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रात अवैध वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्यामुळे ते एका खासगी वाहनातून सुरक्षा रक्षक आरिफ पठाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन लाखणी शिवारात शिवना नदीपात्रात गुरुवारी पहाटे कारवाईसाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांना विना क्रमांकाचा हायवा वाहन उभे असल्याचे आढळून आले होते. पथकाला पाहताच हायवा चालकाने धूम ठोकली. नदीपात्रात आणखी वाहने आहेत का यांची शोध मोहीम घेत असताना पथकाला काही अंतरावर जेसीबी यंत्र दिसून आले. कर्मचारी जेसीबीकडे येत असल्याने चालक फरार झाला. पथक जेसीबी जवळ उभे असताना त्याठिकाणी तीन बुलेटवर पाच ते सहा व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी लांबूनच पथकाला कारवाई करू नका अशी विनंती करत होते.
दगड मारून अंगावर जेसीबी घातली
तहसीलदार गायकवाड यांनी विनंती धुडकावून घटनास्थळावरील वाहने तहसील कार्यालयात घेण्याचे आदेश दिले. तसेच लाखणीच्या पोलीस पाटलांना मदतीसाठी फोन करून बोलावल्यामुळे संतापलेल्या तस्करांनी वाहन जप्त करण्यासाठी विरोध केला. चालकाला त्यांनी बळजबरीने जेसीबी सुरू करून जोरात पळव असे सांगितले. पथक वाहने अडवत असल्याने जेसीबी चालकांला तस्काराने दगड मारून अंगावर जेसीबी घालून टाक असे म्हणत होते. जेसीबी हे तहसीलदाराच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
मी सुरक्षित आहे तहसीलदार राहुल गायकवाड
लाखनी गावात काही दिवसापूर्वी अवैध वाळू वाहतूक चालू आल्याची माहिती मला मिळाली होती, त्यामुळे गुरुवारी पहाटे मी व माझे काही कर्मचारी व सुरक्षा रक्षकासह त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास रवाना झालो.. पहाटे च्या सुमारास त्या घटनास्थळी पोहचलो सदरील ठिकाणी आम्हला हायवा व एका जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले आम्ही कारवाई साठी पुढे गेलो असता त्यांनी जेसीबी आमच्या अंगावर घालण्याचा प्रयन्त केला.आम्ही तात्काळ पोलिसांना संपर्क साधला पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. आम्ही यात एक हायव व जेसीबी जप्त केला आहे.मी सुरक्षित व माझे कर्मचारी सुरक्षित आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव होत नाही -राऊत