औरंगाबाद- शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्ताने शहरात येत आहेत. तत्पूर्वी शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकारने धोरण जाहीर करावे, अन्यथा त्यांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला शिक्षक रस्त्यावर बसून रात्र काढतील, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
गेल्या ८ दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी मूफ्ता संघटनांनी विविध स्वरूपाचे आंदोलन पुकारले आहेत. कधी पिपाणी वाजवून तर कधी फुगे फुगवून आंदोलन करण्यात आले. मात्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शिक्षक संघटनांनी रात्रभर जागून सरकार विरोधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी आंदोलनाचा भाग म्हणून शिक्षक औरंगाबादच्या क्रांतीचौकात रात्र जागून आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
राज्यातील शाळांचे अनुदान वाढविण्याची मागणी संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांनी केली होती. अनेक शिक्षण संस्थांना २० टक्के अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होतो. २० टक्के अनुदानावर चालणाऱ्या अनेक शाळा १०० टक्के अनुदानास पात्र आहे. मात्र तरी देखील सरकार अनुदान देत नसल्याने शिक्षक संघटनांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री मंगळवारी शहरात येणार आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारने धोरण जाहीर न केल्यास शहरातील क्रांतीचौक भागात रात्र जागून आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.