छत्रपती संभाजीनगर Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात प्रवचन देत आहेत. मात्र शेवटच्या दिवशी त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं दिव्य शक्ती सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. धीरेंद्र शास्त्री आव्हाण जिंकल्यास तीस लाख रुपयांचं बक्षीस समितीनं जाहिर केलंय. याआधीही अनेकवेळा आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री पळून गेल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलाय. पण दोन दिवसांपूर्वी अंनिसच्या वतीनं आम्हाला कधीच आव्हान दिलं नाही, अंनिस सर्व काही प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप धीरेंद्र शास्त्री यांनी केला होता. धीरेंद्र शास्त्री यांच्या आरोपाला पत्रकार परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं प्रत्युत्तर दिलंय.
शहरात सुरू आहे बागेश्वरच्या धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील आयोध्या नगरी मैदानावर केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असून, लाखो भाविक रोज या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. या प्रवचनाला भाजपाच्या नेत्यांनी आमदारांनी हजेरी लावली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं अनेक वेळा विरोध केल्यानंतरही अशा पद्धतीनं मंत्री, बाबांना घेऊन प्रवचन आयोजित करताना दिसून येत आहेत.
याआधी दिलं होतं आव्हान : काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं बाबांना चमत्कार दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, आव्हान न स्वीकारतात धीरेंद्र शास्त्री दोन दिवस आधीच शहरातून निघून गेले. याआधी अनेक वेळा अशाच पद्धतीनं त्यांना आव्हान देण्यात आलं होतं, मात्र त्यांनी स्वीकारलं नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोणतेच लोक माझ्यापर्यंत आलेले नाही, असा दावा केला. अंनिसचे सर्व लोक फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी काम करतात, ते समोर आले तर मी त्यांचं आव्हान स्वीकारेन, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला होता. मात्र असा कुठलाच निरोप आमच्यापर्यंत कधीही आलेला नाही. उलट अंनिसनं अनेक वेळा आव्हान दिलं असताना त्यांनी ते स्वीकारलेलं नाही. आम्ही पोस्टमार्फत लेखी स्वरूपात त्यांना आव्हान दिलेलं आहे. बाबांनी आम्हाला लेखी दिलं, तर आम्ही स्वतः जाऊन आमचं आव्हान त्यांना सांगू, अशी माहिती अंनिसचे मराठवाडा संघटक किशोर वाघ यांनी दिलीय.
असं आहे आव्हान : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरात पत्रकार परिषद आयोजन करून धीरेंद्र शास्त्री यांना जाहीर आव्हान देण्यात आलं आहे. धीरेंद्र शास्त्री आपल्या दरबारात लोकांचं भविष्य सांगतात. आम्ही तेच सिद्ध करण्याची मागणी त्यांना केली आहे. महाराजांनी फक्त आपला दिव्य चमत्कार वापरून आम्ही दिलेली माहिती ओळखावी. त्यांचा चमत्कार सिद्ध झाल्यास आम्ही राज्यात सुरू असलेलं कामदेखील बंद करू, असं अंनिसच्या वतीनं सांगण्यात आलं. बाबांना खरंच दिव्य शक्ती प्राप्त असेल, तर देशाला फायदा होईल. आपल्यावर होणारे हल्ले, येणारी संकट हे आधीच कळतील. त्यामुळं बाबांनी आमचं आव्हान स्वीकारावं, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलीय.
हेही वाचा -