औरंगाबाद- सिल्लेगाव पोलीस ठाण्याचा निरीक्षक तीस हजाराच्या लाचेची मागणी करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना ताजी असताना, पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संलग्न असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी देखील तीस हजारांची लाच स्विकारली होती. या घटनांमुळे ग्रामीण पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या घटना निराशाजनक व घृणास्पद आहेत. यापुढे असे प्रकार घडल्यास प्रभारींसह उपविभागीय अधिका-यांवर देखील कठोर व गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असे पत्र त्यांनी जारी केले आहे. त्यामुळे गैरव्यवहार करणा-या पोलिसांमध्ये आता कारवाईची भीती पसरली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार येताच लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात बरेच लाचखोर लाचेच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले आहेत. त्यात पोलीस दलदेखील मागे नाही. १२ जुलै रोजी तीन हायवा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी फुलंब्री, करमाड व चिकलठाण्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या कार्यालयाशी संलग्न असलेल्या रामेश्वर कैलास चेळेकर, अनिल रघुनाथ जायभाये यांनी वाहतूकदाराकडे तीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारला होता. मात्र, त्यावेळी चेळेकरच जाळ्यात अडकला होता. तर जायभाये लाचेची रक्कम घेऊन पसार झाला. त्याला १५ दिवसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान देखील त्याने स्वीकारलेली लाचेची रक्कम अद्याप विभागाला दिलेली नाही.
ही घटना ताजी असतानाच वाळू वाहतूकदाराला ठिकाणे सांगणा-या मुलांवर कलम १०९ नुसार कारवाई न करण्यासाठी सिल्लेगावचा पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली साबीर अली याने २७ जुलै रोजी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाळू वाहतूकदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत निरीक्षक सय्यद शौकत अलीची तक्रार केली. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी खास बीडचे पथक पाचारण करण्यात आले होते. वाळू वाहतूकदाराशी बोलताना निरीक्षक सय्यद शौकत अलीने त्याची झाडाझडती घेत व्हाईस रेकॉर्डर हस्तगत केले. त्यानंतर रेकॉर्डरमधील संभाषणाची टेप नष्ट करून चीपला ओरखडे ओढले होते.
याप्रकारानंतर निरीक्षक सय्यद शौकत अली विरुध्द तो कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात पुरावा नष्ट करणे व लाच मागणी प्रकरणी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे अशा घटना ग्रामीण पोलीस दलात घडू नयेत म्हणून, त्यांनी आदेश काढला आहे. यापुढे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात लाचेची घटना समोर आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचा-याविरुध्द कठोर आणि गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. शिवाय देखरेख व नियंत्रण करणा-या प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांची देखील जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
वाळूमाफियांचे जाळे
औरंगाबाद जिल्ह्यात वाळू उपसा बंद असल्याचे कागदोपत्री असले तरी शहरासह जिल्हाभरात अनेक ठिकाणी वाळू माफियांनी साठेबाजी सुरू केली आहे. हा प्रकार ग्रामीण भागातच नव्हे; तर शहरात देखील पाहायला मिळतो. पोलिसांचा वाळूशी अर्थोअर्थी तसा कुठलाही संबंध येत नाही. वाळू माफियांवर कारवाई करण्याचे काम हे महसूल विभागाचे आहे; असे बरेचसे प्रकार आहेत. ज्यामध्ये पोलिसांचा थेट संबंध येत नाही. परंतु, काही पोलीस वैयक्तिक स्वार्थापोटी अमिषाला बळी पडताना दिसून येतात. काही माफिया अशाच भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून गोरखधंदा करत आहेत.