औरंगाबाद - भाषेला सीमा नसतात असे म्हणतात, मात्र याचा खरा प्रत्यय आला तो औरंगाबादच्या गाडीवाट या तांड्यावर. कारण या तांड्यावरील जवळपास सर्वच लहान मूले चक्क जपानी भाषेत संभाषण करतात. अनेक अडचणींचा सामना करत ही मुले ऑनलाईन पद्धतीने जपानी भाषेचे धडे गिरवत आहे. पाहुयात ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे जपानी भाषा अवगत केली आहे.
जपान हा रोबोटीक प्रणालीत जगात अग्रस्थानी असणारा देश आहे. त्यामुळे रोबोटिक प्रणाली आत्मसात करण्यासाठी या विद्यार्थ्यांना जर्मनीला जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे तेथील भाषा अवगत करून घेण्यासाठी त्यांनी जपानी भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली. जपानला जाऊन रोबोटिक यंत्रणा आत्मसात करायची आणि भारताला देखील रोबोटिकमध्ये जगात पुढे न्यायचे अशी ईच्छा या विद्यार्थ्यांची आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गाडीवाट या तांड्यावर लहान मुले एकमेकांशी बोलताना जपानी भाषेचा वापर करत असल्याचे दिसून आले. खरतर या वयामध्ये आपली मातृभाषा वगळता इतर भाषांमध्ये संभाषण करणे तसे अवघड जात असले, तरी ही मुले जपानी, इंग्रजी आणि मराठी भाषेत चांगल्या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात. या गावातील विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीमधे चांगलाच रस आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये ऑनलाइन पद्धतीने त्यांनी अनेक टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. या अभ्यासातून जपान देशाविषयी त्यांना माहिती मिळाली. जपान हा रोबोटिक्समध्ये अग्रगण्य असा देश आहे. तिथे असणारी टेक्नॉलॉजी ही सर्वात उत्तम आणि चांगली असल्याचे विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्षात आले. त्यानंतर जपानमध्ये जाऊन आपणही रोबोटिक धडे घ्यावे अशी इच्छा या विद्यार्थ्यांच्या मनात आली. त्यासाठी त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून जपानमधील विविध टेक्नॉलॉजींचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिथली टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी तिथली भाषा यायला हवी म्हणून त्यांनी जपानी भाषेचा इंटरनेटवर अभ्यास सुरू केला. गुगल ट्रान्सलेटद्वारे शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात बऱ्याच वेळा वेगवेगळे अर्थ यायचे.
त्यावेळी गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील सातपुते या शिक्षकाने मुलांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, त्यांची ओळख जपानी भाषा येणाऱ्या सुनील जोगदेव यांच्याशी झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना जपानी शिकवण्याचे आश्वासन देत लॉक डाऊनच्या काळात भाषेचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. मात्र गावात मोलमजुरी करणाऱ्यांकडे स्मार्ट फोन कसे असणार. मात्र, त्यातही काही मोबाईलची सोय करुन त्याच्या माध्यमातून सहा विद्यार्थ्यांना भाषा शिकता येईल त्याची व्यवस्था केली. रोज रात्री 7 वाजता या सहा मुलांनी जपानी भाषेचे ऑनलाईन धडे घेण्यास सुरुवात झाली. मात्र इतर विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर या विद्यार्थ्यांनीच मार्ग काढला.
रात्री ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या या सहा विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे ठरवले आणि सुरू झाले सकाळी जपानी भाषेची शिकवणी वर्ग. त्यादरम्यानही सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी दोन - दोन मुलांचे तीन गट तयार करण्यात आले. त्यांना भाषा मित्र ही संबोधण्यास सरु केली. या भाषा मित्रांनी वेगवेगळ्या भागांमधे जाऊन जपानी भाषेचे शिकवणी सुरू केली. जपानी सोबत इंग्रजी नियमित बोलण्यात येऊ लागल्याने या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पायादेखील पक्का होऊ लागला. आता त्यांना जपानमध्ये जाऊन रोबोटीक तंत्रज्ञानात तज्ञ होण्याची इच्छा आहे. भारताला देखील टेक्नॉलॉजीत पुढे घेऊन जाण्याचा मानस असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या संकल्पामुळे गावाला देखील जपानी शिकणारे गाव अशी ओळख मिळाली आहे. नक्कीच या मुलांना जर सरकारी यंत्रणेची मदत मिळाली तर या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत देशाचे नाव देखील मोठे होईल यात दुमत नाही.