औरंगाबाद - पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर, एक ऑगस्टनंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगाला सुरुवात होईल, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथे सांगितले. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी 31 कोटींचे अर्थसहाय्य देखील उपलब्ध झाल्याचे लोणीकर यांनी सांगितले.
राज्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस पडणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पिकांना जीवदान देण्याच्या दृष्टीने कृत्रिम पाऊस पाडणे आवश्यक आहे. हा केवळ एक प्रयोग असून तो किती यशस्वी होईल हे सांगता येणार नाही. मात्र, राज्यात पावसाचे प्रमाण पाहता हा प्रयोग करावा लागणार असल्याचेही लोणीकर म्हणाले.
लोणीकर यांनी एका शिष्टमंडळासह नुकत्याच केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाने वॉटर ग्रीड वापरून पुढील 30 वर्षांसाठी केलेल्या पाण्याचे नियोजन पद्धतीचा अभ्यास केला. त्याच पद्धतीचे नियोजन आपल्यालाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लवकरच राज्यात काम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्त्रायलसोबत झालेल्या करारानंतर वॉटर ग्रीड संकल्पना राज्यात आता अंमलात आणायला सुरुवात झालेली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुरू असलेले पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून यानंतर परभणी व बीड जिल्ह्यांमध्ये काम सुरू होणार असल्याची माहितीदेखील लोणीकर यांनी दिली.