औरंगाबाद - परिवहन विभाग अर्थात एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याची माहिती समोर आली आहे. दरमहा सात तारखेला होणारे वेतन अद्याप मिळाले नसल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे वेतन देण्यासाठी निधी नसल्याने वेतन झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०२० पासून एस. टी. सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एस. टी. महामंडळाचे दररोज २१ कोटींचे उत्पन्न बुडत आहे. हा तोटा सहन करावा लागत असल्याने महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती. परंतु, शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील २०१९-२०२० या वर्षातील विविध प्रवास सवलत मुल्याच्या द्यावयाच्या रकमेपैकी १५० कोटी रुपये दिल्यामुळे माहे मार्च पेड इन एप्रिल २०२० या महिन्याचे वेतन १०० टक्के, ७५ टक्के, ५० टक्के या प्रमाणे पहिल्या टप्प्यात वेतन अदा करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने महामंडळास ३०० कोटी रुपये द्यावे, शासनाने रक्कम न दिल्यास एस.टी कर्मचा-यांचे वेतन होणे अशक्य होईल, अशी मागणी काँग्रेस इंटकच्या वतीने करण्यात आली. राज्यांतर्गत वाहतूक बंद असल्याने राज्यभर गावागावात चालणाऱ्या एस.टीची चाके थांबली आणि महामंडळाच्या तिजोरोत येणारी रसद बंद झाली. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पैसे नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर संकट कोसळले आहे. कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, अशी मागणी काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन माहे एप्रिल २०२० देय, मे २०२०चे संपूर्ण वेतन एकाच टप्प्यात देय असलेल्या तारखेस वेतन अदा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु, महामंडळाकडे वेतन अदा करण्यासाठी रक्कम उपलब्ध नसल्याने १ मे २०२० रोजी आणि ७ मे २०२० रोजी देय असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतन अदा करण्यात आलेले नाही. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन माहे एप्रिल २०२० देय मे २०२० या महिन्याचे संपूर्ण वेतन एकाच टप्यात अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध प्रवास सवलत मुल्यांच्या पूर्तीप्रतिपोटी दयावयाच्या रकमेसह माहे एप्रिल २०२० देय, मे २०२० या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ३०० कोटी रूपये एस. टी. महामंडळास तत्काळ दयावेत, जेणेकरून एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होईल, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.