औरंगाबाद - दारू पिऊन सतत आईला मारहाण करणाऱ्या जन्मदात्या बापाचा मुलाने खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. राजेश रामकृष्ण मुसळे (५५, रा. साईनगर, सिडको वाळूज महानगर) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश मुसळे यास अडीच महिन्यांनंतर अटक केली आहे.
पत्नी, मुलास करत असे मारहाण -
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजेश रामकृष्ण मुसळे (५५, रा. साईनगर, सिडको) यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने ते नेहमी दारू पिऊन त्यांची पत्नी छाया मुसळे यांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे. यामुळे मुलांनी त्यांना वेळोवेळी समजविण्याचा प्रयत्न केला होता. ७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राजेश मुसळे यांनी दारू पिऊन पत्नी छाया मुसळे व मुलास शिवीगाळ करून मारहाण केली.
दारू पिऊन ते खाली पडल्याचे केला बनाव -
त्यांच्या नेहमीच्या या सवयीमुळे ऋषिकेश मुसळे याने रागाच्या भरात वडील राजेश मुसळे यांचे हात धरून लाकडी दांडा तसेच बुक्क्यांने त्यांच्या छातीवर बेदम मारहाण केली. या घटनेत ते बेशुद्ध पडल्याने घरच्यांनी त्यांना उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. यावेळी राजेश मुसळे हे दारू पिऊन खाली पडल्याचे त्यांचा मुलगा ऋषिकेशने डॉक्टरांना सांगितले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी (७ एप्रिल) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राजेश मुसळे यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांना आला संशय -
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. दरम्यान, तपासी अधिकारी यांनी मयताच्या मृतदेहाचा पंचनामा केला असता त्यांना मयताच्या डोळ्याच्या भुवयाजवळ, गालावर, मानेच्या मागील बाजूस तसेच डोक्याला व छातीला मुका मार तसेच ओरखडल्याचे व्रण दिसून आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालात डोक्याला व छातीला मुका मार लागल्याने राजेश मुसळे यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र, राजेश मुसळे यांच्या जखमा मारहाणीच्या किंवा तोल जाऊन पडल्या या विषयी स्पष्ट होत नसल्याने पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दुसरा सविस्तर अहवाल मागितला.
दुसऱ्या अहवालातून मारहाण स्पष्ट -
दरम्यान, डॉक्टरांकडून मिळालेल्या दुसऱ्या अहवालात राजेश मुसळे याचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी मुसळे कुटुंबीयांची कसून चौकशी केली. यात त्यांनी राजेश मुसळे हे मद्य प्राशन करून त्रास देत असल्याने ऋषिकेश मुसळे याने केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - तहसील कार्यालयातच कर्मचाऱ्याने केले विष प्राशन
हेही वाचा - अजिंठा लेणीवर कविता; लेणी जगविख्यात, शायर मात्र गुमनाम