छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून 12 ते 13 महिलांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करत त्याची धिंड काढली. ही घटना कन्नड तालुक्यातील मकरंदपूर येथे घडली. सामाजिक कार्यकर्त्याला चप्पलने मारहाण करत पोलीस स्टेशनला नेले. आजी-माजी सरपंचाच्या विरोधात आपण तक्रार केल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्याने दिली. याप्रकरणी परस्परविरोधी पोलीस तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती कन्नड पोलिसांनी दिली.
अशी घडली घटना : मंगळवारी दुपारच्या सुमारास माहिती अधिकार कार्यकर्ता एका दुकानात बसला होता. त्यावेळेस अचानक एका महिलेशी त्याचा वाद सुरू झाला आणि त्यानंतर 12 ते 13 महिला आणि काही पुरुष असे एकूण 15 जणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर महिलांनी त्याचे डोक्याचे केस ओढत-ओढत त्याला रस्त्यावर आणले. त्यानंतर चपलेने मारहाण करत पोलीस ठाण्यात नेले. तक्रारदार महिलेसह इतर महिलांनी पोलिसांना सांगितले की, या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी एक महिला गेली होती. त्यावेळी या व्यक्तीने जात विचारली. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत महिलेला मारहाण केली.
तक्रार चुकीची : याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने महिलांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सरपंच सना अस्लम शेख आणि माजी सरपंच विनायक सोनवणे यांच्याबाबत आपण अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पुरवठा अधिकाऱ्यांनी गावातील रेशन दुकानामध्ये सुरू असलेल्या काळाबाजाराबाबत तक्रार सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. या तक्रारीची दखल घेत रेशन दुकान बंद करण्यात आले होते. इतकेच नाही तर सरपंच सना अस्लम शेख यांनी अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरून महिलांना हाताशी घेत मला मारहाण केली, असे सामाजिक कार्यकर्त्यांने पोलिसांना सांगितले आहे.
परस्पर विरोधी गुन्हे दाखल : कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथे माहिती अधिकार कार्यकर्त्याला महिलांनी मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेत महिलांच्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सामजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर मारहाण केल्याप्रकरणी महिलांसह 15 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती कन्नड पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -