औरंगाबाद - अब्दुल सत्तार यांना भाजप प्रवेश देण्यास सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे. सिल्लोडच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना भाजपात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली. इतकेच नाही तर दोन दिवसात सत्तार यांचा विरोध करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेली काही वर्ष अब्दुल सत्तार यांचा विरोध भाजप पदाधिकारी करत आहेत. भाजप मजबूत करण्यासाठी अनेक निष्ठावंत जीवाचे रान करत असताना अचानक काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या आमदाराला पक्षात प्रवेश देऊन जर विधानसभेचे तिकीट मिळणार असले तर आमचा विरोध असल्याचे सिल्लोड येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी रावसाहेब दानवे यांना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या विरोधात बंड केला. इतकेच नाही तर पक्षाच्या विरोधात लोकसभेत प्रचार देखील केला. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगत मी त्यांच्या निर्णयाच्या सोबत असेल असे अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले. तसेच सिल्लोड येथील चाराछावण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तार यांचा फोटो असलेले बॅनर झळकले होते. त्यावरून अब्दुल सत्तार भाजप प्रवेश करणार याचे संकेत मिळाले. सोशल मीडियावर अब्दुल सत्तार काँग्रेसचे काही आमदार सोबत घेऊन जाणार असल्याचेही व्हायरल झाले आहे.
या घटनाक्रमामुळे सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. ज्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आम्ही गेली दहा वर्ष काम करत आहोत, त्याच अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन जर विधानसभेचे तिकीट देणार असाल तर आमचा विरोध असेल, असा पवित्र भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कार्यकर्त्यांनी भेट घेत आपला विरोध दर्शवला.
पुढील दोन दिवसात सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येणार असून त्यात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली. अब्दुल सत्तार याना जर प्रवेश देण्यात आला तर भाजपचे पदाधिकारी त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका देखील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.