औरंगाबाद- माझ्या घरावर केलेला हल्ला हा शिवसेनेचा नामर्दपणा आहे. हल्ला करायचाच होता तर समोरून करायला पाहिजे होता. महत्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना माझ्या पाठीमागे लागली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान जनतेने शिवसेनेला नाकारले होते, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. त्यांच्या घरावर अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. त्यावर बोलताना त्यांनीही प्रतिक्रिया दिली.
लोकसभेत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते रोज मला मुसलमानांची औलाद म्हणून हिनवत आहेत. त्यामुळे मी किती सहन करायचे. त्यांनी ही क्रिया बंद केली तर मी प्रतिक्रिया बंद करेल, असे हर्षवर्धन जाधव यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे. मी स्टंट बाजी करत असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. माझ्या घरावर हल्ला करवून घेण्याइतपत माझ्याकडे रिकामा वेळ नाही. माझा पराभव शक्य नाही. लोकसभेत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन माझ्या विरोधात मतदान केले होते. मात्र विधानसभेत सर्वजण वेगळे लढत असल्याने मला लोकसभेत मिळालेली मत मला सहज एकहाती विजय मिळवून देतील, असा विश्वास हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला; अज्ञातांनी केली दगडफेक