सोयगाव( औरंगाबाद) - सोयगाव पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया आज पार पडली. भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी लता राठोड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान सभापतीपदी प्रतिभा जाधव यांची निवड झाल्याने, सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम असल्याची चर्चा आहे.
रुस्तुलबी पठाण यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सभापतीपद रिक्त होते. त्यासाठी आज सोयगाव पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. प्रारंभी भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी लता राठोड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडीकरिता आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे , पंचायत समिती सदस्य रुस्तुलबी उस्मान खा पठाण, साहेबराव जंगलु गायकवाड , धरमसिंग दारासिंग चव्हाण, प्रतिभा जाधव, लता राठोड, संजीवन सोनवणे यांची उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार
दरम्यान शिवसेनेच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रतिभा जाधव तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेखा काळे यांचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मला सभापती पदासाठी संधी दिली. त्यामुळेच मी निवडून आले. त्यांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सभापती प्रतिभा जाधव यांनी दिली आहे.