छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी पाहता या सभा पुढे ढकलण्यात येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. पुणे येथील या जाहीर सभेचे नियोजन अजित पवार यांच्याकडे आहे, मात्र आता अशा परिस्थितीत काय होते हे माहिती नाही. मात्र शरद पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे आहिर यांनी म्हटले आहे.
'कुटुंबीयांना विचारात घेऊन निर्णय' : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याला सर्वांनी विरोध केला. मात्र, शरद पवारांच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठलेही मत व्यक्त केले नाही. यावर सचिन अहिर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, शरद पवार हे एक अनुभवी आणि जाणते नेते आहेत. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ - उतार पाहिले आहेत. एवढा मोठा निर्णय घेत असताना त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली असेलच. त्यामुळेच त्यांच्या पत्नी प्रतिभा ताई तिथे उपस्थिती होत्या. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना हा निर्णय आधीच माहीत असावा, असे मत सचिन अहिर यांनी यावेळी व्यक्त केले.
'साहेबांनी आणखी पुस्तक लिहावे' : सचिन अहिर पुढे म्हणाले की, 'शरद पवार यांना त्यांच्या कारकिर्दीत कधीही थांबलेलं पाहिलं नाही. आजही त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते पक्षातील कार्यकर्त्यांसोबत असणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन नवीन पिढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी आपलं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यांनी अजूनही एक पुस्तक लिहावं व त्यात त्यांच्या जीवनातील घडलेले अनेक चांगले प्रसंग नमूद करावे. ज्यामुळे नवीन पिढीला त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो. हे सगळं जर एकत्र केलं तर तो मोठा राजकीय ग्रंथ होऊ शकतो, असे मत सचिन अहिर यांनी यावेळी व्यक्त केले.
'महाविकास आघाडीवर फरक पडणार नाही' : शरद पवारांनी काल आपली भूमिका जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि इतर पक्षांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, असे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले आहे. वज्रमूठ सभा होत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. अजित पवार यांच्या बाबत अनेक जणांनी संभ्रम निर्माण केला, मात्र त्याचा काही फायदा झालेला नाही. आता झालेल्या सभेत त्यांनी उत्कृष्ट भाषण केले आहे. पुण्याच्या सभेचे नियोजन त्यांच्याकडे आहे. मात्र आताची राजकीय परिस्थिती पाहता या सभा रद्द होणार नाहीत, तर पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असे सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.