औरंगाबाद - औरंगाबादमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभा केला जातोय, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, आज बाळासाहेब असते तर त्यांनी स्मारकासाठी झाडं तोडणाऱ्यांना फटके दिले असते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. एमजीएमचे संचालक अंकुशराव कदम यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये पवार बोलत होते.
औरंगाबाद शहरात मुंडे-ठाकरे यांच्या स्मारकावरून राजकारण तापलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं तोडली जाणार असल्याने अनेक निसर्गप्रेमींनी टीका केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्यान करा. ते उद्यान महानगर पालिकेला नाही तर एमजीएमला सांभाळायला द्या, उद्यान पाहायला लोक बाहेरून येतील, असेही शरद पवार म्हणाले.
मराठवाड्यातील नवीन पिढी कर्तृत्ववान
राजकारणात माणसं सांभाळावी लागतात. अनेक वेळा काही गोष्टी माहीत असूनही ती सांभाळावी लागतात कारण राजकारणात मतं जपावी लागतात असेही पवार म्हणाले. नेहमी मराठवाडा मागास असल्याचं बोललं जातं. मात्र, मला ते मान्य नाही. मराठवाड्यातील नवीन पिढी कर्तृत्ववान वाटते, देश विदेशात युवक आहेत. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
शरद पवारांनी साथ दिल्याने संस्था उभी केली
राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी साथ दिल्याने एमजीएमसारखी संस्था उभी राहिल्याचे मत संचालक अंकुशराव कदम यांनी व्यक्त केले.
काही वेळेला कर्तृत्ववान असूनही अनेकांना न्याय मिळत नाही. उस्मानाबादचे उद्धवराव पाटील कर्तृत्वान नेते होते. ते उत्कृष्ठ संसदपटू होते. सार्वजनिक जीवनात उत्तम कार्य करणाऱ्या, नियमात राहून सर्वसामान्य लोकांचे काम करणाऱ्या उद्धवराव पाटील यांना न्याय मिळाला नसल्याचे पवार म्हणाले. चांगलं काम करणाऱ्यांची नोंद समाजात घेतली जात असल्याचेही पवार म्हणाले.