औरंगाबाद - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता पैठणचे संत एकनाथ महाराजांचे मंदिरही बंद करण्यात आले आहे. पैठण हे मोठे तीर्थक्षेत्र लक्षात घेता याठिकाणी नेहमीच गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाथांचे समाधी मंदिर आणि गावातील मंदिर दर्शनासाठी तातडीने बंद करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. येथील अन्नछत्रालय देखील बुधवारपासून 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे, अशी माहिती नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी दिली. आजपासून (गुरुवार) मंदिराची सर्व दारे बंद करण्यात येणार आहेत. आता केवळ देवाचे नियमित असणारे रोजचे नित्योपचार मंदिराचे पुजारी करतील. तर त्यापाठोपाठ वस्तू संग्रहालय आणि संत ज्ञानेश्वर उद्यान, जायकवाडी धरण तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - राज्यातील रुग्ण अर्धशतकाजवळ; 31 मार्चपर्यंतचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा
प्लेगसारख्या महामारीतही मंदिर बंद करण्यात आले नव्हते. मात्र, देशभरात वाढत असलेले कोरोनाचे संकट पाहून मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.