औरंगाबाद - कोरोनामुळे पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी पादुकाचे शासनाने दिलेल्या परवानगीनुसार 20 मानकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान करण्यात आले. शुक्रवारी दुपारी एक वाजता पारंपरिक पद्धतीने हे प्रस्थान करण्यात आले. प्रथमच 18 दिवस पायी दिंडीचे प्रस्थान न करता या पादुका नाथ समाधी मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यात मानाच्या सात पालखीपैकी संत एकनाथ महाराज पादुका पालखीला शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार तालुका प्रशासनाने केवळ 20 मानकारी सोबत घेऊन पालखी प्रस्थानची परवानगी दिली. शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात पालखी प्रस्थान करुन पुढील 18 दिवस पादुका नाथ समाधी मंदिरात ठेवण्यात आल्या. 30 जूनला शासन निर्देशानुसार पादुका पंढरपूर येथे नेणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज हभप रघुनाथ महाराज यांनी दिली आहे.
यावेळी पोलीस उपाधीक्षक गोरख भामरे, नायब तहसीलदार दत्तात्रय निलावाड, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, जिल्हा परिषद माजी सभापती विलास भूमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, कार्यकारी विश्वस्त दादा बारे उपस्थित होते.