औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पंढरपूर आषाढी वारीचा पायी सोहळा राज्य शासनाने रद्द केला आहे. गेल्या ४२१ वर्षाची परंपरा असलेली वारीची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेला संत एकनाथ महाराज पालखी सोहळा हा एकनाथ महाराज समाधी मंदिरात (बाहेरील मंदिर ) तब्बल १८ दिवस मुक्कामी राहणार आहे.
पारंपारिक नित्य कार्यक्रमानुसार कोरोना साथीचे सर्व निर्बंध पाळून १२ जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान संत एकनाथ महाराजांच्या (गावातील मंदीर) वाड्यातून होणार आहे. हा सोहळा पैठण नगरीतील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात १८ दिवस मुक्कामी राहणार आहे. यावेळी नाथांच्या पवित्र पादुकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांनी दिली.
सालाबादप्रमाणे पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई आषाढी वारी सोहळ्यामध्ये राज्य व परराज्यातून लाखो भाविक पायी वारी करत दरवर्षी येतात. मात्र, यावेळी कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय विविध पालखी प्रमुखांनी घेतला आहे. परंपरा मोडीत निघूनही यासाठी मोजक्या मानकऱ्यांनी पादुका पंढरी नगरीमध्ये घेऊन जाण्याचे ठरले आहे. त्यानुसार पैठण येथील संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा नियोजित तारखेनुसार १२ जून रोजी प्रस्थान होणार आहे. १८ दिवस या पालखीचा मुक्काम बाहेरील नाथ मंदिरात राहणार आहे. यावेळी सोहळ्याचे नित्य कार्यक्रम सर्व नियमाची अंमलबजावणी करून संपन्न होणार आहेत. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत याठिकाणी प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार यांचे हरिकीर्तन होणार आहे. ३० जूनला सकाळी हा पादुका सोहळा मोजक्या मानकऱ्यांसह वाहनाने पंढरपूरला मार्गस्थ होणार असल्याची माहिती रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली.
१ जुलैला संत एकनाथ महाराज पवित्र पादुकांचे चंद्रभागा स्नान संपन्न होणार आहे. त्यानंतर विठ्ठल-रखुमाई मंदिराला नगरप्रदक्षणा घालण्यात येणार आहे. ४ जुलैला संत भानुदास महाराज यांचा समाधी सोहळा विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे. त्याच दिवशी नाथवंशज योगेश महाराज पालखीवाले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.