पैठण (औरंगाबाद) - अवघे वीस वारकरी घेऊन संत एकनाथ महाराज पादुकांचे आज (मंगळवारी) पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने झालेले हजारोच्या संख्येने पाई चालत जाण्याची शेकडो वर्षाची परंपरा आज खंडित झाली, अशी खंत पांडव महाराज पालखी वाले यांनी व्यक्त केली.
संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूर येथे 8 मानाच्या पालखीमध्ये मोडली जाते. या पालखीला साडेचारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी संत एकनाथ महाराज यांच्या पदकाची पालखी घेऊन हजारोच्या संख्येने वारकरी पैठण ते पंढरपूर असा दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास दरवर्षी करत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व मानाच्या दिंड्या पंढरपूरला येणार आहेत. मात्र, यात प्रत्येक दिंडीला मानाचे 20 ते 50 असे वारकरी घेऊन येण्याची ताकीद प्रशासनाने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथ मंदिर येथे गेल्या दोन तारखेपासून विसावा घेत असलेल्या पालखीचे प्रस्थान आज (मंगळवारी) पंढरपूरच्या दिशेने झाले.
हेही वाचा - आषाढी वारी : माऊलींची पालखी अलंकापुरीतून आज पंढरीकडे होणार प्रस्थान
स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार पालखीत सामील होणारे 20 वारकरी यांची वैद्यकीय तपासणी करून एसटी महामंडळाच्या वातानुकूलित बसमध्ये प्रवेश देण्यात आला. या प्रवासात त्यांच्यासोबत शासकीय अधिकारी एस. एन. लाड आणि वायरलेस संच घेऊन पैठण येथील पोलीस कर्मचारी राहणार आहेत, अशी माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
ही बस पैठण, शेवगाव, पाथर्डी, कडा ,करमाळा, शेलगाव करकंब, भोस मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे. दरम्यान, पायी यात्रेदरम्यान ही पालखी शेकडो वर्षांपासून दुसऱ्या मार्गाने जात होती. यावेळी बसच्या माध्यमातून त्याच मार्गाने ही पालखी जावी, अशी विनंती प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने आमच्या विनंतीला मान न दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.