औरंगाबाद - राज्यातील संचारबंदीच्या दुसरा दिवशी औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने नाकाबंदी होत असलेल्या ठिकाणावर अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे. अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत असून, लक्षण नसलेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात संचारबंदीचा काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बंदच्या काळात अत्यावश्यक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याच गोष्टींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे रिकाम फिरणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा फैलाव करणाऱ्या नागरिकांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महानगरपालिकेच्या वतीने बारा टीम तयार करण्यात आल्या आहेत. सकाळच्या सत्रात सहा टीम तर दुपारनंतर रात्रीपर्यंत एक टीम रस्त्यावर तपासणी करणार आहे. त्यामुळे लक्षण नसलेले रुग्ण शोधण्यास मदत होईल आणि त्यामुळे इतर लोकांना होणारी बाधा टाळू शकतो, असा विश्वास डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केला.
या आधी एन्ट्री पॉइंटला सुरू केली तपासणी....
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर अँटिजेन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करताना रोज पन्नासहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अँटिजेन तपासणीत रुग्ण आढळून येत असल्याने शहराच्या चेक पॉइंटवर तपासणी करून रुग्ण शोधण्याचे काम केले जात आहे.