औरंगाबाद - लवकरच औरंगाबाद पालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आज महानगर पालिकेचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामध्ये महापौर, उपमहापौर, माजी महापौर यांच्यासह ४० नगरसेवकांना धक्का बसलाय.
महापौर नंदकुमार घोडेले यांचा इटखेडा वॉर्ड महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने त्यांना त्यांच्या नेहमीच्या वॉर्डच्या बाजूला असलेल्या कांचनवाडी, नक्षत्रवाडी या वॉर्डांमधून नशीब अजमावे लागणार आहे. मात्र, त्यांच्या इटखेडा या वॉर्डात माजी महापौर अनिता घोडेले नशीब आजमावू शकतात. तर नुकतेच उपमहापौर झालेले राजेंद्र जंजाळ यांचा शिवाजीनगर वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षीत झाला आहे. त्यामुळे त्यांना देखील इतर ठिकाणी संधी शोधावी लागणार आहे.
सभागृह नेते विकास जैन यांचा वेदांतनगर वॉर्ड महिलेसाठी आरक्षीत झाला आहे. विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचा क्रांतीनगर उस्मानपुरा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी यांचा जवाहर कॉलनी वॉर्ड नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. तसेच माजी सभापती राजू वैद्य यांचा विद्यानगर वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी तर त्यांचा जुना वॉर्ड क्रांती चौक अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना नव्या वॉर्डाचा शोध घ्यावा लागणार आहे. माजी महापौर भगवान घडमोडे यांचा रामनगर वॉर्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. माजी महापौर गजानन बारवाल यांचा पद्मपूरा वॉर्ड इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षीत झाला आहे. माजी उपमहापौर विजय औताडे यांचा मयुरपार्क वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे.
पदाधिकाऱ्यांसोबत गटनेत्यांना देखील फटका बसला आहे. काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांचा अंबिकानगर, मुकुंदवाडी वॉर्ड सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत झाला आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांचा वॉर्ड विश्रांतीनगर वॉर्ड महिलेसाठी आरक्षीत झाला आहे. शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांचा गणेशनगर वॉर्ड ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झाला आहे. या दिग्गजांसह जवळपास विद्यमान 40 नगरसेवकांना सोडतीत फाटक बसला आहे. ड्रॉ पद्धतीने सोडत पार पडली असून हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली असून निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.