औरंगाबाद : शहरात लावण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. काही कारणास्तव रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यात येत असताना दुसरीकडे उच्चभ्रू वस्तीत राहणारे नागरिक मात्र उद्यानात वावरताना दिसून आले. त्यामुळे काही लोकांसाठी वेगळे नियम आहेत का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
औरंगाबादच्या सिडको एन वन एफ सेक्टर येथील महानगरपालिकेच्या उद्यानात अनेक नागरिक मुक्त वावर करताना दिसून आले. सकाळी काही नागरिक मॉर्निंग वॉक करताना, काही लोक कुटुंबियांसह व्यायाम करताना तर काही लोक आपल्या मित्रांसोबत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत गप्पा गोष्टी करताना दिसून आले. त्यामुळे, महानगरपालिकेच्या उद्यानात सुरू असलेला हा वावर कोरोनाचा फैलाव करत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसंदिवस वाढत चालला असून संख्या आठ हजारांवर गेली आहे. वाढत असलेली संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार 10 ते 18 जुलैदरम्यान जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदमध्ये औषधी दुकानांसह पेट्रोल पंपदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे, आवश्यक नसताना विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून गस्त घालत बाहेर पडणाऱ्या नागरिकांना समजून सांगत आहेत. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई होत असताना उच्चभ्रू वस्तीत मुक्त वावर करणाऱ्या नागरिकांकडे मात्र, कोणाचे लक्ष नासल्याच दिसून आले.
10 जुलैपासून लॉकडाऊन असताना मात्र, सिडको एन वन भागातील एफ सेक्टर येथे असलेल्या महानगरपालिका उद्यानात नागरिक वावरताना दिसले. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या बंदमध्ये सिडको उद्यानात नागरिक सकाळी फिरताना, मित्रांसोबत कोणतेही अंतर न ठेवता गप्पा मारताना, कुटुंबियांसोबत व्यायाम करताना दिसून आले. त्यामुळे सुरू करण्यात आलेला बंद हा उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांसाठी नाही का? या भागातील नागरिक कोरोनामुक्त आहेत का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे हातावर पोट असणारे नागरिक कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी आपल्या घरात बसून आहेत. तर, दुसरी कडे धनाढ्य लोकांची वस्ती समजल्या जाणाऱ्या एन वन भागातील नागरिक मात्र सर्रास वावर करत आहेत. अशात त्यांना कायद्याचा धाक दाखवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.