औरंगाबाद - देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या 'रॉ'चा अधिकारी असल्याची थाप मारून अनेकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अभिजीत पानसरे, असे या तोतया रॉ अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले आहे.
अभिजीत पानसरे हा, आपण आयपीएस अधिकारी असून रॉसाठी काम करत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षीत असलेला पानसरे इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. २०१६ मध्ये औरंगाबाद योथील रहिवासी शरद गवळी यांची पानसरेसोबत अॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. त्यानंतर पानसरे याने नासाच्या वतीने आपल्याला न्यूक्लीयर रिएॅक्टर तयार करण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासवले. त्यावेळी, पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिला देखील होत्या.
हेही वाचा - यवतमाळमध्ये क्रेडिट कार्डद्वारे २ लाखांचा गंडा; मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशमधील
अभिजीत पानसरे याच्यावर विश्वास ठेवून शरद गवळी यांनी पानसरेच्या प्रकल्पात ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात २ कोटी ५० लाख रूपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर पानसरे हा गवळी यांना परतावा देण्यास टाळाटाळ करत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर गवळी यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पानसरे याला अटक करण्यात आली आहे. पानसरेवर नाशिक येथेदेखील गुन्हा दाखल आहे. दरम्यान, त्याच्याविरोधात अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.