छत्रपती संभाजीनगर - वाळूज महानगर बजाजनगरातील छत्रपती नगरमध्ये बहिणीच्या घरी राहत असलेल्या ३० वर्षीय भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ऐन रक्षाबंधनाच्याच दिवशी भावाने आत्महत्या केल्याचे दिसताच बहिणीने एकच आक्रोश केला. आकाश सर्जेराव शिंदे ३०, मूळ गाव खैरका पोस्ट बोमनाळी ता मुखेड जि. नांदेड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या महिनीनुसार गोविंद संभाजी गोंधळे व सुनंदा गोविंद गोंधळे हे पती पत्नी वाळूज महानगर बजाज नगरातील महादेव वाघमारे यांच्या रुममध्ये भाड्याने राहतात. सुनंदा यांचा भाऊ सुध्दा बहिणीसोबत राहत होता. हे तिघेही खासगी कंपनीमध्ये काम करतात. आज रक्षाबंधन असल्याने भाऊ घरीच होता. तर दोघे पती पत्नी हे कंपनीत कामाला गेलेले होते.
बहीण घरी आल्यानंर उघडकीस आली घटना - कंपनीत कामासाठी गेलेली बहीण सुनंदा यांची सुट्टी झाल्याने त्या दुपारी साडेतीन वाजता घरी आल्या. बराच वेळ दरवाजा वाजवून भाऊ दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून आवाज देण्यासाठी बाहेरुन खिडकी उघडली. भावाने आतमध्ये आत्महत्या केल्याचे बघताच बहिणीने मोठा आक्रोश केला. शेजारील नागरिक जमा झाले. खूप दिवसांपासून भाऊ लग्नाचा विचार करत होता. त्यात तीन वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे भाऊ खूप तणावात होता असं बहिणीचं म्हणणं आहे. ताई मला माफ करा असं लिहून ठेवत त्याने जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे, आमलदार युसूफ शेख किशोर गाडे, स्वप्नील अवसरमल, गणेश सागरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसंच मनोज जैन व नागरिकांच्या मदतीने मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवला, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं.
परिसरामध्ये खळबळ - ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली. तसेच केवळ लग्न होत नाही म्हणून असं टोकाचं पाऊल उचलल्यानं लोकांनी हळहळ व्यक्त केली.
हेही वाचा