औरंगाबाद - आज सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले. सोमवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तशीच काहीशी परिस्थिती औरंगाबाद शहराचीदेखील होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
सोंगलेल्या तुरी भिजल्या -
शेतकर्यांनी आपल्या शेतातील तुरीची काही दिवसाअगोदर सोंगणी केली होती. तर काही शेतकऱ्यांची सोंगणी सुरू होती. मात्र, आज अचानक आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची धांदल उडाली. शेतातील काही तूर ओली झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतेत -
वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिकांवर पाणी साचून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाते का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता -
आम्ही नियमितपणे आमचे दैनंदिन कामे करत होतो. सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळेल. मात्र, दुपारनंतर अचानक पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्याने शेतातील सोंगलेल्या तुरीमध्ये पाणी गेले. तसेच या पावसामुळे इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी गणेश खटके यांनी दिली आहे.
हेही वाचा - संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावे - प्रकाश आंबेडकर