औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आईनेच आपल्या दोन मुलांचा गळा दाबून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिण भावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते.
मुलांना मारणारी आई मनोरुग्ण : कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केले. अदीबा फहाद बसरावी (वय 8), तर अली बिन फहाद बसरावी, (वय 4) वर्षीय मुलाचे नाव आहे. आपल्याच मुलांना मारणारी आई मनोरुग्ण असल्याची बाब तपासात समोर आली आहे. औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलांचा मत्यू नेमका झाला कसा : पोलीसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपले होते. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली, त्यावेळी दोघेही बेशुद्ध असल्याचे आढळून आले होते. कुटुंबीयांना दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिथे मुलांना मृत घोषीत केले. मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेणे पोलीसांसमोर आव्हान होते. अखेर पोलीसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यावेळी दोन्ही मुलांच्या आईनेच रात्री मुलांचा गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.
आईने मुलांना नेमके का मारले : दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आरोपी आई पोलीसांच्या ताब्यात आहे. मात्र आईने दोन्ही मुलांना नेमके का मारले? याबाबत माहिती उघड होऊ शकली नाही. कौटुंबिक कलह किंवा पती पत्नीच्या वादातून तिने रागात टोकाचे पाऊल उचलले का? याबाबत तपास करण्यात येत आहे. पोलीस तपासात आरोपी आई मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. तरी नेमके तिने हे पाऊल का उचलले? याबाबत सातारा पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.