औरंगाबाद - राफेल प्रकरणी चौकशी झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. भाजप सध्या साम, दाम, दंड भेद वापरून इतर पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी औरंगाबादेत केला. काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण औरंगाबादेत आले होते.
अनिल अंबानी यांची रिलायन्स अटलांटिका फ्लॅग या फ्रान्स स्थित कंपनीला १५० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे १२०० कोटी रूपयांचा कर भरणा करण्यास तेथील कर विभागाने सांगितले. हा कर भरणा २०१२ ते २०१५ पर्यंतचा होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारा दरम्यान अनिल अंबानी यांच्या कंपनीला ऑफसेट कंत्राट मिळवून दिले. त्यानंतर फ्रान्स सरकारच्या कर विभागाने करमाफी करत कराची रक्कम ११०० कोटीने कमी केली. असा गौप्यस्फोट आज एका राष्ट्रीय फ्रेंच दैनिक ले माँडने केल्याचा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केला.
राफेल विमान सौदा प्रकरणाची एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारने चुकीची आणि अपूर्ण माहिती देत सर्वोच्च न्यायालयाचा भ्रमनिरास केला. आता सर्वोच्च न्यायालयाने अरुण शौरी यांच्याद्वारे दाखल केलेल्या पुनरावलोकनाची याचिका स्वीकारली आहे. तसेच न्यायालयाने हिंदू वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या पुराव्याप्रमाणेच चोरी झालेले कागदपत्र स्वीकारली आहेत. राफेल कराराची सुनावणी सुरू केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनिल अंबानी आणि सहभागी असलेले नोकरशहा राफेल विमान घोटाळ्याच्या व्यवहाराच्या संदर्भात तुरुंगात असू शकतात, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
देशाचे लोक एनडीए सरकारला कंटाळले आहेत. जे शेतकऱ्यांमधील समस्या, जीएसटी अंमलबजावणी, नोटाबंदी, बेरोजगारी यासारख्या सर्व आघाड्यांवर अयशस्वी झाले. व्यापारी आणि उद्योग क्षेत्र देखील प्रभावित झाले. मागील निवडणुकीत त्यांना दिले गेलेले बहुतेक शब्द पूर्ण करण्यात ते अयशस्वी ठरले, असा आरोप त्यांनी केला. प्रचार मोहिमेदरम्यान नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास विसरले आहेत. ते आमच्या भारतीय जवानांच्या नावावर मत मागत आहेत, जे चुकीचे आहे. या संदर्भात रिटायर्ड आर्मी ऑफिसरच्या तक्रारी राष्ट्रपतींकडे पोहोचल्या आहेत.
राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यांच्याविषयी बोलताना जे लोक भाजपमध्ये सहभागी होत आहेत त्यांना सरकारकडून कारवाईची भीती आहे. ही नेते मंडळी सहकार क्षेत्राच्या पट्ट्यातील असून भाजप साम, दाम, दंड, भेद अवलंबत त्यांना अडकवत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार दडपशाही करत असुन तुमची कुंडली आमच्याकडे आहे, असे सांगत ब्लॅकमॅलिंग करत आहे. सरकारकडे काहीच पुरावे नाहीत. मात्र, तुम्ही कर्जवगैरे घेतले असेल तर मिटवावे, असा सल्ला मी देतो असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.