औरंगाबाद - हर्सूल कारागृहातून जामीनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक काढल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. बेगमपुरा भागात ही मिरवणूक काढण्यात आली होती. शहरात निवडणूक मतमोजणी असल्याने कलम 144 लागू करण्यात आलेले असताना विना परवानगी ही मिरवणूक काढण्यात आली.
निवडणून आलेल्या उमेदवाराप्रमाणे निघाली मिरवणूक -
ड्रग्स तस्करी प्रकरणी अटकेत असलेला अकबर हाश्मी या आरोपीला 2 डिसेंबरला हर्सूल कारागृहातून जामीनावर सोडण्यात आले. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याचे जंगी स्वागत केले. कारागृह परिसरात अनेक जण त्याच्या स्वागतासाठी आले होते. कारागृहजवळ स्वागत समारंभ उरकल्यानंतर आरोपी राहत असलेल्या बेगमपुरा परिसरातही त्याचे जंगी स्वागत झाले. कारच्या छतावर बसवून त्याला हार-तुरे घालून निवडणून येणाऱ्या उमेदवाराप्रमाणे त्याची मिरवणूक काढण्यात आली होती.
काय होते प्रकरण ?
ड्रग्सची तस्करी करणाऱ्या चौघांना २९ सप्टेंबरला पंचवटी चौकात सापळा रचून वेदांतनगर पोलिसांनी अटक केली होती. आसिफ अली मुसा कुरैशी ( ४१, रा.कुर्ला, मुंबई), नुरूद्दीन बद्रोद्दीन सय्यद ( ४१, रा. बांद्रा, मुंबई), फैजान खान आयुब खान (वय ३४, रा.आरेफ कॉलनी), अकबर हाश्मी हिमायत हाश्मी ( २४, रा.आसेफिया कॉलनी) अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एमडी ड्रग्सच्या १३ तर चरसच्या २५ पुड्या जप्त केल्या होत्या. याप्रकरणात बुधवारी अकबर हाश्मी याची हर्सूल कारागृहातून जामीनावर सुटका झाली. यावेळी तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करत बेगमपुरा भागात त्याची मिरवणूक काढली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता या प्रकारावर पोलिसांकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.