औरंगाबाद - 'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात कन्नड येथील १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या प्रेरणा प्रदीप मनवर या विद्यार्थीनीच्या प्रश्नाची निवड करण्यात आली होती. तर याच विद्यालयातील ११ वीत शिक्षण घेणाऱ्या अर्जुन थोरात याला कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.
हेही वाचा - अर्थव्यवस्थेचे 'गुलाबी चित्र' धूसर; आयएमएफकडून चालू वर्षात ४.८ टक्के जीडीपीचा अंदाज
अभ्यास सकाळी लवकर उठून करावा की रात्री? असा प्रश्न प्रेरणाने पंतप्रधानांना विचारला. यावर तुला हा प्रश्न का विचारावा वाटला, असा प्रतिप्रश्न मोदींनी केला. 'मला रात्री अभ्यास करायला आवडते. मात्र, आई-वडील सांगतात की सकाळी लवकर उठून अभ्यास करत जा. त्यामुळे माझ्या मनात याबाबत साशंकता होती. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारायचा ठरवला' असे प्रेरणा म्हणाली.
हेही वाचा - मोदींशी झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' नंतर पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
यावर विद्यार्थ्यांनी त्यांची इच्छा आणि सोयीनुसार अभ्यासाची वेळ ठरवावी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करण्याचेही आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या या उत्तरामुळे समाधान झाले असून माझ्यासह आई वडिलांच्याही मनातील शंका दूर झाली, अशी प्रतिक्रिया प्रेरणाने दिली.