औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे यंदा नुकसान झाले आहे. त्यांना मदत करायला सरकार सक्षम नसेल तर, त्यांनी तात्काळ सत्ता सोडावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केली. दरेकर आजपासून चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
दौऱ्यांची सुरुवात औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील चौका येथून केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दरेकर यांनी समजून घेतल्यात. औरंगाबादनंतर, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या नुकसनाबाबत दरेकर पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रवीण दरकेर म्हणाले, की ओला दुष्काळ असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी नसल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर, सरकारने निधी उभा करायला पाहिजे. राज्यकर्ते म्हणून ती त्यांची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्याला मदत उभी करणे अवघड नाही. शेतकऱ्यांना आज मदतीची खरी गरज आहे. वेळ गेल्यावर त्या मदतीचा काही उपयोग होणार नाही. निधी उभा होईपर्यंत शेतकरी आडवा होईल. त्यामुळे मदत देता येत नसेल तर, शेतकऱ्यांनी तात्काळ सत्ता सोडावी, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. दरेकर म्हणाले की, सध्या पिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तीन महिन्यांपासून प्रशासन पाहणीच करत आहे. मात्र मदतीबाबत अद्याप निर्णय नाही, त्यामुळे शेतकरी घाबरलेला आहे. लवकरच मदत जाहीर केली नाही तर, भाजपा नक्कीच आवाज उठवणार, असा इशारा दरेकर यांनी सरकारला दिला.
पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारी अधिकारी फक्त पाहणी करून जात आहे. पिकांचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे केले जात नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी चौका येथील शेतकऱ्यांनी केली आहे.