औरंगाबाद - पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
सर्व शिक्षा अभियानातंर्गत ग्रामीण व शहरी भागात शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी राज्य शासनाने शिक्षणासह चांगला पोषण आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार योजनेतंर्गत सर्व शाळांमध्ये पोषक असे अन्नधान्य पुरवले जाते. मात्र, पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील जिल्हापरिषदच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना पोषण आहराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात आहे.
हेही वाचा - तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; नातेवाईकांची तरुणाच्या आजीला मारहाण
गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटलांसह गावकऱ्यांनी शाळेला भेट दिली असता, निकृष्ट दर्जाचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शाळेच्या गोदमाला ताळे ठोकले. अधिकारी आल्या शिवाय गोदाम न उघडण्याची भूमिका नागरिकांनी घेतली होती. या घटनेला पूर्णपणे मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक शंकर नलावडे यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
हेही वाचा - मानवी साखळीद्वारे चिमुकल्यांनी केली मतदान जनजागृती
शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी ए. के. पुदाट व वाहेगावचे सरपंच शिवाजी बोबडे, पोलीस पाटील आत्माराम नवले, राजु मोहीते, राजु बोबडे, उध्दव बोबडे व ग्रामस्थांनी शाळेची पाहणी केली. त्यावेळी अन्नधान्य निकृष्ट असल्याचे दिसून आले. तसेच अन्नधान्यामध्ये जाळी आणि किडे असल्याचे आढळून आले. तसेच संगणक कक्षही धुळ खात पडला होता. तर वॉटर फिल्टरही बंद होता.
त्यामुळे यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. त्यामुळे ग्रामस्थांचा रोष पाहत विस्तार अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक नलावडे यांच्याकडील पोषण आहाराची जबाबदारी काढुन शिक्षक वाघमोडे यांच्याकडे दिली. दरम्यान, याच शाळेत निकृष्ट शालेय पोषण आहार देण्याची ही दुसरी वेळ आहे.