छत्रपती संभाजीनगर : ऐन रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील शांततेला गालबोट लागले आहे. किराडपुरात 2 गटात तुफान राडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त (सीपी) निखिल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीत दगडफेकही झाली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्यात आला. आता परिस्थिती शांत आहे. समाजकंटकांनी दगडफेक करत पोलिसांसह खासगी वाहनांची जाळपोळ केली आहे. तणावाची स्थिती पाहता शहरात एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले. राडा करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रात्री दोन गटात झाले वाद: किराडपुरा येथे राम मंदिरात रामनवमीची तयारी सुरू होती, त्याचवेळी बाहेर दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शिवीगाळ, धक्काबुक्की त्यातून दगडफेक सुरू झाली. मर्यादित पोलीस असल्याने अतिरिक्त कुमक मागविली. मात्र तोपर्यंत जमावाने मंदिराच्या बाहेर असलेली पोलिसांच्या वाहनांसह इतर अशी एकूण दहा ते बारा वाहन पेटविली. यात अद्याप जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले, तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना कळतात सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र हा वाद पहाटे चार वाजेपर्यंत सुरू राहिला. पोलिसांसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शांततेचे आणि जिल्ह्यात सर्वत्र रामनवमी शांततेत साजरा करावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
शहरात नाराजी व चिंतेची स्थिती औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर शहरात तणावाची स्थिती दिसून आली होती. त्यानंतर शहराचे नाव बदलण्यावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. संवेदनशील शहर असलेल्या शहरात पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे. मात्र, ऐन रामनवीच्या दिवशी दोन गटातील वादाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी शहरातील उद्योजकांनी शहरातील तणावाच्या स्थितीवरून नाराजी व्यक्त केली होती. मागास म्हटल्या जाणाऱ्या मराठवाड्याचे विभागीय कार्यालय असल्या शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आता संपूर्ण मराठवाड्यात चिंता दिसू लागली आहे.
नामांतरनंतर दंगल घडवण्याचा प्रयत्न? शहराच्या नामांतरावरून जिल्ह्यात सामाजिक वातावरण खराब झाल्याचे पाहायला मिळाले. यात दोन समाजात काही वेळा वाद देखील निर्माण झाले. एकीकडे नामांतराला समर्थन देणारे तर दुसरीकडे विरोधात असलेले नागरिक, यांमध्ये सोशल मीडियावर वॉर गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले. पुढील काही दिवसात सामाजिक वातावरण बिघडेल अशा घटना होऊ शकतात अशी, शक्यता वर्तवली जात होती. त्यात रामनवमीच्या रात्री अशा पद्धतीने दोन गटात निर्माण झालेले वाद आणि त्यानंतर दंगल करण्याचा झालेला प्रयत्न, त्यामुळे नामांतराचीच ठिणगी आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-Ram Navami 2023 : काय आहे रामनवमीचा इतिहास, का साजरी करण्यात येते रामनवमी