औरंगाबाद - शहरात शनिवार-रविवार कडककडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते निर्मनुष्य आहे. दरम्यान, शनिवारी असलेल्या रेल्वे बोर्ड भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्र गाठणे विद्यार्थ्यांना खूप कठिण गेले. अशातच एक विद्यार्थीनी भर उन्हात रिक्षा शोधत होती. यावेळी तिने उपस्थित पोलीस शिपायाजवळ आपली कैफियत मांडली. त्यानंतर पोलीस शिपायाने तिला परीक्षा केंद्रावर सोडल्याने ती पेपर देऊ शकली.
रस्त्यावर दिसली वर्दीतली माणुसकी -
मूळची बुलडाणाची असलेली मीनाक्षी धंदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहन शोधत होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिला कोणतेच वाहन मिळत नव्हते. त्यानंतर जवळच असलेल्या एका पोलिसाने तिची विचारपूस केली. त्यावर रडता-रडताच तिने परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहनच मिळत नसल्याची कैफियत मांडली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, एस.एस. पुरी, आर.के. वाणी, हनुमंत चाळनेवाड यांनी तिला धीर दिला. तसेच तिला परीक्षा केंद्रावर पोहचवले.
हॉटेल बंद असल्याने उपाशी -
परीक्षेसाठी बुलडाणा, शेगाव, जालना, हिंगोली, परभणी येथून अनेक विद्यार्थी औरंगाबादमध्ये आले होते. परंतु लॉकडाऊनमुळे येथील हॉटेल बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागले.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंना कळेल त्यांचा ओसामा काय करीत होता; वझेंवरून सौमेयांचा निशाणा