औरंगाबाद - कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड मतदारसंघात हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत प्रचार करत असताना बुधवारी करंजखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाधव यांनी असभ्य भाषेचा वापर केला होता. त्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेत संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक शिवसैनिकांनी विविध पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत.
हेही वाचा - माझ्या घरावर केलेला हल्ला हा तर शिवसेनेचा नामर्दपणा- हर्षवर्धन जाधव
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी व्हिएसटी पथक प्रमुख राजमहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.