औरंगाबाद - पोलिस आयुक्तालया तर्फे पोलिस व नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन छावणी पोलिस ठाणे येथे करण्यात आले होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उप आयुक्त निकेश खतामोडे, पोलिस निरीक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश सराफ उपस्थित होते. यावेळी छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी वयक्तिक तर काहींनी सर्वजणी समस्या मांडल्या.
नागरिकांनी मांडल्या तक्रारी -
पाडेगाव येथील मुख्य रस्त्यावर वाहनाचा वेग प्रचंड असतो. यामुळे महिला, मुल, वृध्दांना रस्ता ओलांडत येत नाही. यामुळे बऱ्याचदा याठिकाणी अपघातही होतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावे. गतिरोधकांमुळे अपघात रोखण्यासाठी मदत होईल. रात्री याठीकाणी ट्रॅफिक पोलिस नेमणूक करावी अशी मागणी पाडेगाव येथील नगरसेवक सुभाष शेजवळ यांनी केली. भीमनगर भवसिंगापुरा येथे नशेखोर तरुणांचा हैदोस वाढला असून यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यासाठी या भागात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी ॲड. संतोष लोखंडे यांनी केली.
हॉस्टेल परिसरात टवाळखोर वाढले -
मिलिंद कॉलेजमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ज्यास्त आहे. यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी वसतिगृह राहतात. मात्र, मुलींच्या वसतिगृह परिसरात टवाळखोर तरुण छेड काढतात. यामुळे वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी पोलिसांची गस्त असावी अशी मागणी डॉ.अरुण शिरसाठ यांनी केली.
पोलिस मित्र संकल्पना राबवावी -
तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात पोलिस आणि नागरिकांमध्ये समन्वय असावा यासाठी शहरातील सुशिक्षित नागरिकांना पोलिस मित्र म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यामुळे घडामोडींची माहिती पोलिसांना मिळत होती. परिसराची माहिती असल्याने नागरिक सूचना करत. यातून गुन्हेगारी रोख्यासाठी व पोलिसांना तपास करण्यासाठी मदत होत होती. यामुळे पोलिस मित्र म्हणून संकल्पना पुन्हा एकदा राबवावी अशी मागणी डॉ.निलेश अंबावाडीकर यांनी केले.
नागरिकांचा प्रतिसाद -
पोलिस व नागरिक स्नेहसंमेलनासाठी परिसरात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी देखील उपस्थित होते. यावेळी अनेक भागात अवैध दारू विक्री, नशेखरी, रोडरोमियोचा महिलांना होणार त्रास, दुचाकी चोऱ्यांचे वाढते प्रमान तर अनेकांच्या जमिनी बळकावल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिस आयुक्तांनसमोर मांडल्या.
आठवडा भारत सर्व तक्रारी सोडवू - डॉ.निखिल गुप्ता ,पोलिस आयुक्त
नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारी गंभीर आहेत. यासाठी प्रत्येक तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना पोलिस निरीक्षकांना केल्या आहेत. अनेक तक्रारीत मी स्वतःच माहिती घेणार आहे. येत्या आठ दिवसांत संपूर्ण तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. यापुढे कोणाला काही तक्रारी सूचना असतील तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता असे पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता म्हणाले.