औरंगाबाद - शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहनधारकांसह पोलीस यंत्रणाही भांबावून गेली आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असून वैजापुर पोलिसांच्या एक आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडून तब्बल नऊ चोरीच्या दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. आरोपीकडून अजूनही काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसाकडून वर्तविण्यात येत आहे.
मित्राच्या मदतीने केली चोरी
वैजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस नाईक जालिंदर तमनार, पोलीस अंमलदार विशाल पैठणकर हे जुन्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात आरोपींना अटक करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी दादासाहेब काशिनाथ नवगिरे (वय २२,रा.पानव,वैजापुर) ताब्यात घेवून चौकशी केली असता मित्र विशाल भारत मस्के (रा. पानगव्हाण, ता. वैजापूर) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच दोन मोटर सायकल व वैजापूर शहरातून इतर ठिकाणावरून चोरी केलेल्या सात मोटर सायकल चोरल्याचीही कबुली दिली. मात्र, पोलिसांची भनक लागताच आरोपी विशाल भारत मस्के हा फरार झाला.
आरोपीकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
या कारवाईत दरम्यान, पोलिसांनी नऊ मोटरसायकल बुधवारी हस्तगत केल्या तर आणखी काही मोटारसायकल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून शहर व ग्रामीण भागातून दुचाकी चोरत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून अजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.