औरंगाबाद - मौजमजा व नशापाणी करण्यासाठी ३ अल्वपवयीन मुलांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे. एका अट्टल गुन्हेगाराच्या बोलण्यावरून ही अल्पवयीन मुले दुकानाचे शटर उचकटून चोऱ्या करीत होती. या तिन्ही मुलांना पुंडलीक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी यापूर्वी मुकुंदवाडी, गारखेडा, खुलताबाद, आदी ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
कामगार चौकातील सुरेश पंडितराव कचकुरे यांचे साईबाबा डेली नीड्स, विष्णु भगवान सोनवणे यांच्या मालकीचे टेस्टी राईट तसेच चंद्रकांत चव्हाण यांचे भक्ती कलेक्शन या तीन दुकानात १४ मे रोजी चोरी करण्यात आली होती. यावेळी चोरट्यांनी हजारोंची रोख रक्कम व मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी १५ मे रोजी पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, सीसीटीव्ही अस्पष्ट दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना संशयावरून ताब्यात घेतले. या तीन्ही संशयित मुलांनी ब्रँडेड कपडे, गॉगल, बूट, चप्पल आदी खरेदी करण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी चोरी करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याजवळून विविध ब्रँडचे मोबाईल, कपडे, गॉगल इत्यादी साहित्य जप्त केले असल्याची माहिती पुंडलीक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी दिली.