औरंगाबाद - बनावट लग्न करून नवरदेवाला गंडविणाऱ्या टोळीतील सदस्य महिलेला दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. ममता सुरेश पाटील (२०, रा. पांडे चौक, जळगाव) असे ( Marriage fraud case Mamta Suresh Patil ) तिचे नाव आहे. तर टोळीतील तीन महिला आणि अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. यापूर्वी देखील अशाच एका टोळीने श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावमधील एकाला शहरात गंडविल्याची घटना घडली होती.
हेही वाचा - Load Shedding in Maharashtra : राज्यात कोळसा नसल्याने भारनियमन होईल, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे संकेत
खुलताबाद तालुक्यातील शेतकरी प्रकाश लाटे (रा. मावसाळा) हे मुलगा राजेशच्या लग्नासाठी वधूचा शोध घेत होते. अशातच जळगावातील टोळी त्यांच्या संपर्कात आली आणि त्यांचा वधू मुलीचा शोध संपला. या टोळीची जळगावातील मुख्य सूत्रधार आशाबाई पाटील हिने साथीदार लताबाई पाटील, रिना पाटील, बाबुराव रामा खिल्लारे आणि पांडूरंग विनायक कदम यांच्या मदतीने प्रकाश लाटे यांना जाळ्यात ओढले. तिने जळगावातील मुलगी शुभांगी प्रभाकर शिंदे (बनावट नाव) हिच्याशी विवाह लावून देते, असे सांगत त्यासाठी हुंडा आणि सोन्याचे दागिने द्यावे लागतील असे लाटेंना सांगितले. त्यानंतर तडजोडीअंती एक लाख ३० हजार हुंडा आणि ७० हजारांचे दागिने दिले. फारसा संपर्क नसताना देखील हे लग्न जुळले. २६ मार्च रोजी राजेश आणि शुभांगीचा मावसाळा येथील एका दत्त मंदिरात मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने लग्न समारंभ आटोपण्यात आला. लग्नानंतरचे सर्व विधी देखील पार पाडण्यात आले.
विवाहिता झाली पसार : लग्नानंतर वधू-वर फिरायला गेले. त्यातच ३० मार्च रोजी दौलताबादेतील देवगिरी किल्ला पाहण्यासाठी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास राजेश आणि शुभांगी गेले. राजेश किल्ला पाहण्यासाठी तिकिटाच्या रांगेत उभा राहिला. त्याचवेळी शुभांगीने मी हॉटेलातून पाण्याची बाटली घेऊन येते असे सांगत एका कारमधून धुम ठोकली.
आतापर्यंत तिघांना गंडविले : दौलताबाद पोलीस ठाण्याच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शुभांगी असे बनावट नाव सांगत असलेल्या ममताला जळगावातील पांडे चौकातून ताब्यात घेतले. तिला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ममताने आतापर्यंत तीनवेळा बनावट लग्न केले आहे. राजेशसोबतच तिने गुजरात आणि जळगावातील अंमळनेर येथील एकाला गंडविले आहे. त्यातच गुजरात येथे पोलिसात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. तर,अंमळनेर येथे कोणतीही तक्रार देण्यात आली नसल्याचे दौलताबाद पोलिसांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी घडला प्रकार : बनावट लग्न लावून दागिने आणि दीड लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार १९ ऑक्टोबर २०२० रोजी समोर आला होता. यावेळी श्रीरामपूर तालुक्याच्या कारेगावातील गणेश भाऊसाहेब पवार यांना गंडविले होते. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी सविता राधाकिसन माळी, संगिता विश्वनाथ वैद्य, अर्चना देविदास ढाकणे, पूजा अजय राजपूत आणि रवी तेजराव राठोड यांना अटक केली होती.